राजकीय

रमेश आडसकरांचा सर्वच नेतृत्वावरील विश्वास उडाला

प्रतिनिधी

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

माजलगावातून केवळ जनता जर्नाधनाच्या आर्शिवादाने आडसकर लढण्यावर ठाम 

Download Aadvaith Global APP

माजलगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षापासून पायात भिंगरी घालून भाजप नेते रमेशराव आडसकर फिरत होते. 10 वर्षात करोडो रुपयांचा ‘चुना’ लावून घेत जनसेवा व समाजसेवा केली. 2019 साली भाजपने माजलगावातून त्यांना उमेदवारी दिली. मात्र अवघ्या 12 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला आणि विजयाने हुलकावणी दिली. एका पराभवाने खचून न जाता आडसकरांनी ही 12 हजाराची आघाडी कमी करुन थेट 25 हजाराची आघाडी स्वतःला कशी मिळेल या साठी प्रयत्न सुरु केले. गेल्या 5 वर्षापासून आडसकर हे माजलगावच्या मातीत पाय घट्ट रोवून बसले आहेत. मात्र मध्यंतरीच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुतीमधील एन्ट्रीने राज्यातील राजकीय समीकरणाची वाट लागली. अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी पसार होत आहेत. आता अवघ्या महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. आडसकर यांनी माजलगावच्या मातीत चांगली कोळपणी, चांगली नांगरणी करुन जमीन सुपीक बनविली आहे. त्यातच त्यांचे उमेदवारीचे त्रांगडे उभे टाकले आहे. सध्य स्थितीवरुन त्यांच्या उमेदवारीची आशा दुरापास्त झाली आहे. म्हणून त्यांनी ‘ एकला चलो रे ‘ चा नारा देवून मी तटस्थपणे निवडणुक लढविणार आणि जिंकणार असल्याचे जाहिर केले आहे. आडसकरांचा सर्वच राजकीय पक्षावरील विश्वास उडाला असून आपण मैदानात असणार पण चिन्ह, पक्ष, व भुमिका स्पष्ट केलेली नाही. माजलगाव मधील मतदारांच्या आर्शिवादाने 2024 ची निवडणुक लढण्यावर ते ठाम असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.

. रमेशराव आडसकर या नावाला लोकनेते स्व.बाबुराव आडसकर यांचे वलय आहे. बीड जिल्ह्यात हाबाडा फेम आडसकर म्हणून ओळख आहे. रमेशराव आडसकर हे गेल्या 25 वर्षापासून सक्रिय राजकारणात व समाजकारणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्गे भाजपा असा त्यांचा प्रवास आहे. परिस्थितीचे अवलोकन करुन त्या संदर्भात निर्णय घेणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 2014 साली राज्यातील परिवर्तनाची लाट पाहून आणि जो नेता आपल्याला पक्षातून उमेदवारी देवू शकतो यावर विश्वास ठेवून रमेशराव आडसकर यांनी 2014 साली परिवर्तनाच्या लाटेत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. 2014 साली त्यांनी माजलगावातून उमेदवारीची मागणी केली नाही किंवा दावा ठोकला नाही कारण त्या ठिकाणी माजी आ.आर.टी.देशमुख हे सक्षम उमेदवार होते. आडसकरांनी आर.टी.देशमुख यांच्या विजयासाठी मेहनत घेतली. आणि आडसकरांमुळे केज व माजलगावची जागा भाजपाला जिंकता आली. आडसकरांचे दोन्ही मतदारसंघावर प्राबल्य आहे. त्या ठिकाणचा प्रस्थापित समाज आडसकरांच्या सोबत राहिलेला आहे. आडसकरांनी 2014 ते 2019 या कालावधीत माजलगाव मतदारसंघात फिरुन जनसंवाद वाढविला त्या ठिकाणच्या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावून जनमत प्राप्त केले. 2019 ला पंकजाताईंनी आडसकरांना उमेदवारी दिली. आडसकरांनी त्या ठिकाणी होम पीच नसतानासुद्धा चांगली लढत दिली आणि अवघ्या 12 हजार मतांनी पराभव झाला. काही निर्णय आणि काही प्रसंग त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले. 12 हजाराचा उट्टा काढण्याचा संकल्प त्याच दिवशी त्यांनी केला. आडसकरांनी माजलगावमध्ये निवासस्थान व कार्यालय थाटून त्याच ठिकाणी सर्वाधिक वेळ दिला. माजलगावमध्ये चांगले संघटन निर्माण केले. जनआंदोलनामध्ये त्यांचा पुढाकार दिसून आला. गेल्या पाच वर्षात आडसकरांनी आ. प्रकाश सोळंकेना जोरदार विरोध करुन स्वतःचे जनमत निर्माण केले आणि आडसकर हे आपले नेतृत्व असू शकतात हे दाखवून दिले. या पाच वर्षाच्या खटाटोपीमध्ये जवळपास करोडो रुपयांची उधळण करण्यात आली. ज्यामध्ये गणेशोत्सव असेल, वेगवेगळ्या जयंत्या व पुण्यतिथी असतील किंवा वेगवेगळे सप्ताह किंवा कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाना आर्थिक मदत करुन ते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले पाहिजेत त्यासाठी त्यांचा प्रयत्न राहिला. करोडो रुपये खर्चुनसुध्दा आज उमेदवारीची शाश्वती नाही. गेल्या महिन्याभरात पंकजाताई मुंडे यांच्याशी संपर्क साधून उमेदवारीच्या बाबतीत चर्चा केली, संवाद केला मात्र महायुतीमुळे आडसकरांची उमेदवारी ‘कात्रीत’ सापडली आहे. आजच्या स्थितीला महायुतीच्या धोरणाप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला उमेदवारी त्या प्रमाणे त्या ठिकाणची जागा सोडली जाणार आहे. माजलगावमध्ये विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचा) आहे त्यामुळे प्राधान्याने ती जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे. आडसकरांची निष्ठा व श्रध्दा ही पंकजाताई मुंडे यांच्यावर सर्वाधिक आहे. परंतु त्यांचे प्रयत्न कामी येतील का? हा अनुत्तरीत प्रश्न आहे. माजलगाव मतदारसंघाने पंकजाताईना ९०० मतांची आघाडी दिलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीला रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु उमेदवारीची शाश्वती नसल्याने आणि कुठल्या पक्षाकडून उमेदवारी घ्यावी आणि आपण जिंकू का? या विवंचनेत सापडलेल्या आडसकरांनी आता थेट जनता जर्नाधनाच्या आर्शिवादाने निवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे. ‘ येतील ते सोबत आणि न येतील त्यांच्या शिवाय ‘ ही निवडणुक लढविली जाणार आहे. आडसकरांचा हा ठाम निर्धार समाज माध्यमातून जाहिर करण्यात आला आहे. आडसकरांचा आता कुठल्याही राजकीय पक्षावर व नेतृत्वावर विश्वास राहिला नसल्याचे या माध्यमातून दिसून येत आहे. आडसकर यांच्यामुळे माजलगाव मतदारसंघातील सत्ताधार्‍यांचे विजयाचे गणित बिघडणार आहे आणि आडसकर जिंकण्याच्या मनसुब्याने मैदानात उतरत आहेत. त्यामुळे माजलगावची लढाई ही लक्षवेधी ठरणार आहे.

Share

मुख्य संपादक- प्रदिप देविदास मुंडे

माझा पुढारी या न्यूज पोर्टलवर बातम्या पाठवण्यासाठी पुढील संपर्क: https://api.whatsapp.COM/send?phone=+918888280757&text=hi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये