
बीड लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यांनी सोमवारी या पराभवाच्या दुःखाची खपली काढत अवघ्या 6 हजार मतांनी आमची इज्जत गेल्याची भावना व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत केवळ 6 हजार मतांनी आमची इज्जत गेली. ही खूप खोलवर झालेली जखम आहे. ही जखम अद्याप भरली नाही, असे ते म्हणाले आहेत.
बीड विधानसभा मतदारसंघात सोमवारी बाबा सिद्दिकी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्पसंख्याक मेळावा झाला. या मेळाव्याला उपस्थित मुस्लिम बांधवांपुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी उपरोक्त सल बोलून दाखवली.
ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या कालात मौलाना महामंडळासाठी आम्ही दीड हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. पण तत्कालीन सरकारने आम्हाला दमडीही दिली नाही. पण अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये आल्यानंतर तत्काळ हा निधी मंजूर करण्यात आला.
उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून यंदा पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांना कडवी टक्कर देत त्यांचा पराभव केला. त्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले.