विधानसभेत जरांगे फॅक्टर पुन्हा यशस्वी होऊ शकतो का? याकडे सर्वांचे लक्ष.
गेवराई प्रतिनिधी:- विजय चव्हाण

गेवराई प्रतिनिधी:- विजय चव्हाण
विधानसभेत राजकीय एन्काऊंटर करणार असा इशारा जरांगे पाटील यांनी भाजपला दिलाय. लोकसभेत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसला. आता विधानसभेत महाराष्ट्रात 288 जागा आहेत. त्यामुळं पुन्हा जरांगें खेळ बिघडवू शकतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
निवडणुका लढायच्या का, याचा निर्णय 20 तारखेला जरांगे घेणार आहेत. त्याआधी अंतरवाली सराटीत जरांगेनी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरु केल्यात. याआधीही जरांगेंनी मुलाखती घेतल्या असून संभाव्य यादीही जरांगेंनी तयार केली. पण इच्छुकांच्या भेटीगाठीसह रात्रीच्या 2 भेटी खास आहेत..भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगे पाटलांची रात्री पावणे 2 वाजता भेट घेतली. 8 दिवसांतच विखे दुसऱ्यांदा जरांगेंच्या भेटीला आले. तर विखेंच्या भेटीनंतर रात्री पावणे 3 वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपेंनीही जरांगेंची भेट घेतली.
सुजय विखेंनी संगमनेरमधून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांविरोधात लढण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र एका घरात एकच तिकीट या धोरणामुळं भाजपनं तिकीट नाकारल्याची माहिती असल्यानं सुजय विखे अपक्ष लढण्याची शक्यता आहे. त्यामुळं अपक्ष लढल्यास मराठा समाजाची मदत मिळेल का ?, याचाच अंदाज घेण्यासाठी विखेंनी जरांगेंची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीवरुन विचारलं असताना, आता सरकारच राहिलं त्यामुळं चर्चा करुन काय उपयोग ?, त्यांचा मालकच भरकटलाय म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी उमेदवार दिले होते…जरांगे फॅक्टरमुळं थेट नुकसान महायुतीचंच झालं. आणि महाविकास आघाडीला फायदा झाला. मराठवाड्यातील लोकसभेच्या 8 मतदारसंघापैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले आणि महायुती पराभूत झाली. आता पुन्हा एक तर पाडापाडी करणार किंवा उमेदवार देणार हे जरांगेंनी ठरवलंय. 20 तारखेला जरांगेंनी उमेदवार देण्याचं ठरवलं तर मतांचं विभाजनं मोठ्या प्रमाणात होणार हे निश्चित आहेत.