
गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम केलं जात आहे, शिवसेना ठाकरे गटाने गोपीनाथ मुंडे हयात नसताना त्यांची अशी बदनामी करणे उद्धव ठाकरेंना शोभत नाही, संजय राऊत शिवसेना पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाही, असे प्रत्युत्तर राज्याचे कृषीमंत्री आणि गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
बीड येथील आशीर्वाद लॉन्स येथे मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे नाव घेऊन भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली. ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या ‘चेहरा कोण?’ शिर्षकाच्या अग्रलेखात जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरुन भाजपने शिवसेनेसोबत कसे राजकारण केले, याचा खुलासा करण्यात आला. त्यात गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून आता फडणवीसांपर्यंत भाजप असेच राजकारण करत आल्याचे म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाने गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेतल्याने त्यांचे पुतणे धनंजय मुंडे भडकले. ते म्हणाले की, हे सांगायलाही अतिशय वाईट वाटत आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनाही वाईट वाटले असते. गोपीनाथ मुंडे हयात नसताना त्यांची बदनामी करणे उद्धव ठाकरेंना शोभत नाही. ते हयात असताना काहीही बोलले नाही, ते नसताना त्यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत यांना लाज वाटायला पाहिजे. संजय राऊत हे शिवसेना पूर्णपणे पाण्यात घालणार आहे, अशी टीका कृषीमंत्री मुंडेनी केली