
चाटगाव तलावाचा सांडव्याला लागली गळती
आलेल्या मोठ्या झाडांमुळे संरक्षण भिंतीला तडे जाण्याची शक्यता
धारुर तालुक्यातील चाटगाव तलावाच्या दुरुस्त केलेल्या सांडव्याला गळती लागली असून येथील तलावाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्याला गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून,पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
दिंद्रुड सह परिसरातील चार ते पाच गावांना व शेतीला पाणीपुरवठा करणारा चाटगावचा तलाव गेल्या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे कोरडाठाक पडला होता. यामुळे दिंद्रुड सह परिसरातील चार ते पाच गावांना उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या होत्या परंतु यावर्षी वरूण राजाने कृपा केल्यामुळे दमदार पाऊस झाला असून तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे परंतु गेल्या दोन वर्षांपूर्वी थातूरमातूर पद्धतीने दुरुस्त केलेल्या सांडव्याला गळती लागल्यामुळे यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे जर ही गळती बंद केली नाही तर वरून येणारे पाणी बंद झाल्यास तलावात 50 ते 60 टक्केच पाणी शिल्लक राहील.यामुळे परिसरातील हजारो लोकांना निसर्गाची कृपा होऊनही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे वेळीच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सुरू असलेली गळती तात्काळ थांबवावी अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी करत आहेत.
चौकट
तलावाच्या संरक्षण भिंतीवर दोन्हीकडून लिंबाची बाभळीची व इतर प्रजातीची मोठी मोठी झाडे आली असल्यामुळे तलावाच्या संरक्षण भिंतीला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन तलावाच्या संरक्षण भिंतीवरील आलेली ही झाडे तात्काळ काढून टाकावीत.
– उध्दव केकाण, ग्रामस्थ तथा शेतकरी चाटगाव.