
:- राजकारण हा सापशिडीच्या खेळासारखा अनिश्चिततेचा विषय झाला आहे. आजची गृहतिके उद्या कायम राहतील याची कोणीच हमी घेऊ शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महायुतीची उमेदवारी म्हणजे शंभर टक्के विजयाची हमी हे गणित आता पार कोलमडून गेलं आहे.
अजितदादा पवारांनी राष्ट्रवादी सोडत महायुतीची साथ संगत केली त्यावेळी मतदार संघातील भाजपची राजकीय ताकद पाहता
भविष्यात आपल्याला विधानसभा जिंकण्यासाठी ही कुमक उपयोगी पडेल, आणि महाराष्ट्रात जिंकेल त्याची जागा हा जागावाटप करतानाचा सर्वकष निकष असल्यामुळे आ.प्रकाशदादा सोळंके यांनी महायुतीत जायचा निर्णय घेतला.
आणि तशीच काहीशी अवस्था भाजपा नेते रमेशराव आडसकर यांची झाली आहे. गेली पाच वर्ष पुढील भाजपाचा उमेदवार मीच असणार असा ठाम विश्वास मनाशी बाळगत पाच वर्षात आडसकरांनी गाव न गाव, वस्ती न वस्ती पिंजून काढली, परंतु आता सोळंके यांच्या महायुतीतील प्रवेशामुळे आडसकरांच्या भाजप उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्यंतरी आडसकर धनंजय मुंडे यांच्या मदतीने घड्याळ हाती घेऊन महायुतीचे उमेदवार होणार अशा चर्चाही रंगल्या. परंतु यदा कदाचित तसे झालं तरी आता महायुती उमेदवारीवर माजलगाव जिंकणे सोपे राहिले नाही. त्याचे कारणही तसेच आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठा -ओबीसी वाद उफाळून पंकजाताई मुंडे यांचा अनपेक्षित पराभव झाल्यावर मुंडे समर्थक ओबीसी मतदार मुंडे फॅमिली तसेच स्वतःच्या कार्यक्षमतेला दोष न घेता सर्व खापर भाजपमधील सोळंके, आडसकर, जगताप या मराठा नेत्यावर फोडत आहेत.वास्तविक पाहता आरक्षण प्रश्नासाठी सर्व मराठा समाजाने एकवटून भाजपच्या विरोधात मतदान केलं. दलित मुस्लिमांनी ही राष्ट्रीय प्रश्नावर महाविकास आघाडीला साथ दिली. हे लक्षात घ्यायला कोणीच तयार नाही.
पराभवानंतर ही भाजपाने पंकजाताई मुंडे यांना आमदार करून राजकीय पुनर्वसन केलं. त्यामुळे पंकजाताई ही काहीशा राजकीय सौम्य भूमिका घेत पक्ष वाढीसाठी सक्रिय झाल्या आहेत. धनंजय मुंडे ही सर्व काही कटूता विसरून स्वतःचे राजकीय भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आंतरवाली सराटीत जाऊन मनोज पाटील जरांगे यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
परंतु पंकजाताईंचा लोकसभा निवडणूक पराभव जिव्हारी लागल्याचा दावा करत धनगर समाज नेते माधव तात्या निर्मळ, डॉ. भगवानराव सरवदे तसेच वंजारी समाजाचे नेते बाबरी मुंडे विधानसभा निवडणुकीत माजलगाव चा आमदार ओबीसी करण्याचा च्या निर्धाराने मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
आज तरी वंजारी आणि धनगर हा भाजपाच्या मुख्य मतांचा पाया असणारा समाज भाजपपासून दुरावला आहे. एक फुटक मतदान भाजपाला पडण्याची शक्यता नाही. भाजपा नेते मोहनदादा जगताप हे चाणाक्ष आहेत. त्यांनी या राड्यात न पडता डायरेक्ट अपक्ष उमेदवारी जाहीर करून प्रचार सुरू केला आहे. अशावेळी जर प्रकाश दादांचे राजकीय वारस जयसिंह सोळंके अथवा रमेशराव आडसकर यांनी जर महायुतीची उमेदवारी घेतली तर यांची राजकीय आत्महत्या निश्चित आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा राजकीय फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार मा.आ.राधाकृष्ण होके पाटील यांना झाल्याशिवाय राहणार नाही.हे ही तितकंच खरं आहे …