पोखरण १ व २ ला जोडणारा रस्ता खुला करून वाहतूक कोंडी सोडवावी..मनसेची आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी..
ठाणे प्रतिनिधी

वाहतूक कोंडी सोडवून ठाणेकरांना द्यावा दिलासा
ठाणे, दि. १५ (प्रतिनिधी) अमित देसाई
घोडबंदर, माजीवडा, कापूरबावाडीला जाणारा पर्यायी मार्ग म्हणून पोखरण रस्त्याकडे पाहिले जाते. मात्र तीन हात नाकापासून घोडबंदर मार्गाची झालेली दैना, मेट्रो मार्गिकेची कामे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अपयशी ठरलेले वाहतूक नियोजन, अवजड वाहनांची घुसखोरी आणि अपघाताच्या घटनांमुळे पोखरण रोड ही वाहतूक कोंडीमध्ये अडकला आहे. पण रेमंड कंपनीने ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित केलेला पोखरण १ व २ यांना जोडणारा ३० मीटर रुंदीचा रस्ता खुला केला तर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. यासाठी हा मार्ग लवकरात लवकर खुला करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओवळा माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दररोज सकाळी तसेच संध्याकाळी सिंघानिया शाळेसमोरील रस्ता तसेच वर्तकनगर, समतानगर ,शास्त्रीनगर, गांधीनगर, वसंत विहार या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. कॅडबरी जंक्शन ते माजिवडा कापूरबावडी या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली असते त्यातून प्रवास टाळण्यासाठी बरीच वाहने पोखरण १ मार्गे वर्तकनगर, शास्त्रीनगर, देवदया नगर वरून वसंत विहार मार्गे जातात. २०२१ साली रेमंड कंपनीकडून ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित केलेला ३० मीटर रुंदीचा पोखरण १ व पोखरण २ यांना जोडणारा रस्ता खुला केल्यास वर्तकनगर, शास्त्रीनगर, समतानगर, शिवाईनगर, गांधीनगर, वसंतविहार या भागात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.
वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांना हा रस्ता लवकरात लवकर खुला करून दिलासा दयावा अशी मागणी पाचंगे यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर अनेक जनहिताचे निर्णय –
टोल माफी असो किंवा एसटीच्या दरवाढीचा निर्णय रद्द करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे सरकार करत आहे. मात्र ठाण्याला सर्वाधिक भेडसवणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून ठाणेकरांना दिलासा कधी देणार असा सवालही केला जात आहे.