महिला अत्याचार आणि महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक
ठाणे प्रतिनिधी: अमित देसाई

ठाण्यात जोरदार निदर्शने
ठाणे – राज्यात महागाई आणि महिला, लहान मुलींवरील अत्याचार याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठिशी घालण्याचे प्रकार या राज्य सरकारकडून सुरू आहेत, असा आरोप करीत “वध तीनतोंडी रावणाचा लढा स्त्री सन्मानाचा” असा नारा देत महिलाध्यक्षा रोहिणी खडसे , डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाण्यात निदर्शने करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. लहान मुलांचे लैंगिक शोषण होत आहे. मात्र, एकाचे एन्काऊंटर करून इतर गुन्हेगार कसे वाचतील, याची दक्षता घेतली जात आहे. याचा निषेध म्हणून ठाणे महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांच्या हातात सरकारचा निषेध करणारे फलक होते. तसेच महिलांनी, “या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, लाडकी बहिणीचे पैसे नको, बहिणीला सुरक्षा द्या” , अशा घोषणा दिल्या.
याप्रसंगी सुजाताताई घाग म्हणाल्या की, या राज्यात दिवसाला लहान मुलींचे लैंगिक शोषण होत आहे. त्याकडे लक्ष न देता हे सरकार लाडकी बहीण योजनेचे मार्केटिंग करीत आहे. दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार घडत आहेत आणि सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार च्या महिला आंदोलन करीत आहेत. याची तरी दखल घेऊन सरकारने महिलांची काळजी घ्यावी. पंधराशे रूपये देणाऱ्या या सरकारमधील एखाद्या मंत्र्यानेतरी महागाईचा विचार केला आहे का? पंधराशे रूपयात महिलांची मते विकत घेण्याचा प्रयत्न करणार्या या सरकारला आम्ही धडा शिकवू, असे सांगितले.
या आंदोलनात युवक अध्यक्ष विक्रम खामकर , विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल कांबळे, हॉकर सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, महाराष्ट्र प्रदेश सदस्या शशी पुजारी, पुजा उदासी , माधुरी सोनार, राणी देसाई , मनिषा करलाद विधानसभा अध्यक्षा फुलबानो पटेल , साबिया मेमन , ब्लॉक अध्यक्षा ज्योती निम्बर्गी, मनिषा भोर, मनिषा भाबड, सुजाता गवळी, कोपरी ब्लॉक अध्यक्ष आरती घोलप, मिनाज शेख, प्रतिभा पूर्णेकर, शकिना भाभी, शायना आजमी आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्यांनी सहभागी झाले होते…